Friday 20 December 2013

गोंधळ बातम्या, गोंधळ चर्चा आणि आपली फसवणूक 


दूरदर्शनवरील बातमीपत्र आठवतात का रे तुला ? रोज सायंकाळी ७ वाजता असतात पण सध्या प्रदीप भिडेंचा भारदस्त आवाज नसतो. तो आवाज फक्त भारदस्त होता असे नव्हे त्याबरोबर एक संथ लयीवर सर्व बातम्या, दिवसभराच्या घडामोडी सांगितल्या जायच्या. कधीही , कुठेही घाई - गडबड आणि मुख्य म्हणजे आरडओरडा नाही. अजूनही दूरदर्शनवरील बातमीपत्र तशीच आहेत आणि मला अआवर्जून आवडतात बघयला. 

खाजगी वाहिन्या तांत्रिक दृष्ट्या प्रगत असतील पण त्यांना दूरदर्शनसारखी थोडक्यात, महत्वाचे आणि मोजक्या शब्दात सांगण्याची कला आणि कसब नाही अस वाटत. कदाचित, २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या असल्यामुळे तेथे बातमीपत्र "लांबलचक" आणि "दिलखेचक" अदाकारीने सांगितली जातात. बातमीपत्र सांगणारा/री यांचा पोशाख  पण कमालीचा बदलला आहे आणि ते सुटाबुटात दिसतात, महिला निवेदक सुद्धा!!. दूरदर्शनवरील निवेदक मात्र पारपंरिक आणि नाविन्य दोन्हींचा वापर करताना दिसतात. दीपावली, दसरा यासारख्या सणादिवशी हमखास पारपंरिक पोशाख त्यातही दूरदर्शनचे मात्र एवढे भारीतील नसतात पण खाजगी वाहिन्यावरील ( IBN -लोकमत, ABP -माझा ) निवेदक एकदम चमचमत असतात. 

हे सर्व वरवर दिसणारे फरक आहेत. मला ज्याकडे लक्ष वेधायचे आहे ते म्हणजे, खाजगी वाहिन्यावर असणारी चर्च्यासत्राकडे , ४-५ वेगवेगळ्या क्षेत्रातील ( त्याच्यादृष्टीने बुद्धिमान, विद्वान  हा !!)  लोकांना घेऊन जो गोंधळ घातला जातो त्यामुळे बातमी बघण्यातील सगळा रस निघून जातोय. चर्चासत्र चालू होते ते मुळात एखाद्या ब्रेंकिंग न्यूजने आणि त्यावर सगळी मंडळी, निवेदाकाबरोबर तो विचारील त्या प्रश्नाला उत्तर न देता आणि वेगळाच काहीतर मुद्दा सांगत /मांडत नाहक वादविवाद ( हीच का ती चर्चा ) करताना दिसतात. निवेदकपण काही कमी नाहीत. तो/ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो/ते  सगळ्यांना आणि प्रत्येकाची मते ( भाग घेणारी मंडळी स्वताचे  मत रेटत राहतात ) मागतो. राजकीय चर्चा असल्यास तर अजून फोडणी आणि भडका असतो. नेतेमंडळी आपला पक्ष कसा बरोबर ( घड्याळातील वेळ!!) आहे आणि तो किती निर्मळ ( कमळ नव्हे !!), स्वच्छ  ( हात असतात ) आहे हे अगदी पान खाऊन आणि तोंड रंगवून ( स्वताचेच)  बडबड करतात. 

या अश्या चर्चांमुळे आपण  मात्र एखाद्या घटनेचे गांभीर्य हरवून बसतो आणि मुख्य मुद्दा बाजूला जाऊन भलतीकडेच चर्चा संपते आणि लोक त्या बातमीकडे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पाहतपण नाहीत. हि एक प्रकारे आपली फसवणूक आहे ती नाही… हो फसवणूक कि हसवणूक!! कारण बातम्या, चर्चासत्र म्हणजे आता करमणूक झाली आहेत. पूर्वी अश्या कार्यक्रमातील लोक त्या घटनेतून बोध घेऊन शोधून शोधून एक तर त्याबद्दल लिहित किंवा त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत. आताही काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर सगळा उजेडच ??? ( उजेड कसा म्हणायचं  बर ) सगळा अंधारच आहे. ह्यातसुधा ती वाहिनी कोणाच्या मालकीची आहे त्यावर बातमीचा ढंग, निवेदन आणि त्याची तीव्रता ठरते. 

दीपक चौरासिया म्हणायचा "चैनसे सोना है, तो जाग जाओ" तसे आता म्हणायची वेळ आली आहे " छान बातम्या ऐकायःचा आहेत तर "दूरदर्शन " पहा"… फसवणूक करून घेऊ नका… 

Thursday 19 December 2013

काय भावा, काय म्हणतोस !!!

किती वेळा विचार केला कि आपण पण ब्लॉग लिहावा आणि मनात येणाऱ्या विचारांचा जो खळखळ लोंढा आहे तो व्यवस्थितपणे पाटाच्या पाण्यागत मनाच्या शेतात फिरवावा. आता मुहूर्त झाला आहे आणि मनाचा संवाद चालू होऊन, आता  त्याच्याशी गप्पा मारणे आणि त्याचा शब्दरूप प्रवाह येते रिता करणे, म्हणजेच कोल्हापुरी शब्दात मी माझ्या मनाला रोज ( जमलं  तर !!) काय भावा, काय म्हणतोस  !!! म्हणणार आहे...