Tuesday 7 March 2017

जागतिक महिला दिन - ३६५ दिवस

व्हाट्स अप वर सकाळपासून महिला दिन विशेष मेसजेचा पाऊस पडत होता. एरवी जी मित्र मंडळी वर्षभर स्त्रियांच्यावरअश्लिल विनोदांचा खच पाडतात, तिच्या दिसण्यावरून, कपडे घालण्याच्या पद्धतीनुसार तिला 
बेब, आयटम, सामान काय वाट्टेल ते बोलतात ...३६४ दिवस तिचाआदर नाही करत, आज अचानक महिला दिनानिमित्त लगेच स्त्रियांना शुभेच्छा पाठवतात. अक्षरसह: व्हाट्स अप वरुनच कानाखाली जाळ काढावा वाटतो अश्याच्या. 

हा, दिन साजरा झालाच पाहिजे पण तो ३६५ दिवस, वर्षभर ..

लक्ष्मी-भवानीमाता-चंडिका-सरस्वती 
अशी नानाविध रूप तिची
तिच्यात असलेल्या असम्य-दुर्दम्य सृजनशिल शक्तिला प्रणाम 

मनाला खूप भावलेली आणि अशीच व्हाट्स अप आलेली कविता 

आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा..!!
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा..!!
सख्या,चुलत,मावस बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा..!!
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला शुभेच्छा..!!
आज्जीच्या संस्कार सृष्टीला 
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला 
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला शुभेच्छा..!!
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत,वर्तमान,भविष्यकाळी  रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा