Saturday 29 August 2020

टाळेबंदी आख्यान 

आपण सगळेच स्वानुभवातुन किंवा दुसऱ्यांचें अनुभव वाचून, बघून त्यातून काही घेण्यासारखं असेल तर नवीन काही तरी शिकत असतो आणि नसेल काही घेण्यासारखं तर मनोरंजन म्हणून गोड मानत असतो.

कोरोनामुळे आलेल्या  टाळेबंदीत घर"कोंबडा" झाल्यामुळे आलेल्या अनुभवाचे सर्वात मोठे संचित म्हणजे, घरी असल्यावर कधी आपले तोंड उघडावे (उचकटावे म्हणायचे होते पण असो) आणि कधी बंद ठेवावे यांचे इंगित उमजलं. जेणेकरून आपले साध्य (खाण्यापिण्याचे, भजी -वडे, चहाचे वगैरे) साध्य होतील. पुर्वी लोकांना अमोल पालेकरचे गाणे आठवायचे "गोलमाल है भाई सब गोलमाल है", आता मला आठवते "जपून जपून जपून जारे, पुढे धोका आहे". महाराष्ट्राची हास्यजत्रा बघण्याचा परिणाम असावा. 

अजून एका सत्याचा साक्षात्कार म्हणजे स्वयंपाकघर खरोखरच एक प्रयोगशाळा आहे. वेगवेगळे चविष्ट पदार्थांची भट्टी जमवण्यासाठी कारभारणीला करावे लागणारे प्रयोग बघणे जणु; विणाताईंचे "एक होता कार्व्हर" वाचण्यासारखे आहे. याचबरोबर घरी असल्यामुळे एकंदरीतच साफसफाई करावी असा अलिखित नियम असतो बहुतेक, कुठे काही कचरा, धुळ वगैरे दिसल्यास "तु तु मैं मैं" न करता मुकाट्याने झटकनी शोधावी. कारभारणीसोबत असाच स्वच्छतेचा प्रयोग करतां लक्ष्यात आले कि साधारण २०-२१ डब्बे (लहान, मध्यम आणि मोठे अशा आकाराचे) आणि ८-१० काचेच्या बरण्या आहेत. दर सहा महिन्यातुन एकदा हा स्वच्छतेचा प्रयोग करावा लागतो, मदत केली तर घरात होऊ शकण्याऱ्या शाब्दिण्विक (शाब्दिक +अण्विक) युद्धाचा धोका टळतो. 

अमेरिका - उत्तर कोरिया, भारत पाकिस्तान यांच्यातील अण्विक युद्धाचा धोका, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या समस्या यांसारख्या वैश्विक समस्यानंतर, मला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे, स्वयंपाकघरातील तेलकट -मळकट कि धुळकट अर्थात "तेलमिश्रित धुळमळकट" डब्बे आणि डब्ब्यांची झाकणे कमीतकमी कष्टात, दीर्घकाळ लखलखीत -चकचकीत कशी राहतील ही होय. :) या घरगुती स्वच्छता अभियानामुळे जी महागडी शिडी घेतली होती, तिचा पुरेपूर वापर झाल्यामुळे चुटपुट लागायची कमी झाली आणि घरातील कोपऱ्या कोपऱ्यामधे महाजाळीराज कोळीराज यांनी तयार केलेले फ्रॅक्चल (fractal) नक्षीकामाचे सौंदर्य बघून मी धन्य पावलो. 

लहान लहान गोष्टीत डोंगराएवढा आनंद असतो आणि तो हवा असेल तर घरातील लहान मुलाबरोबर लहान होऊन खेळले की तो गवसतो. पुन्हा एकदा आपले लहानपणीचे छंद पुरवून घेतले, गोट्या -विटीदांडू- खेळता नाही आले पण नुरा कुस्ती, टेररसवर क्रिकेट अन पळापळ, कॅरम, बुद्धिबळ, अंताक्षरी वगैरे वगैरे सगळं झालं. कराओकेचे  ऍप वापरून ७०-७५ गाणी रेकॉर्ड केली, ८ वर्षे हॉस्टेलवर राहायला असतानाचा बाथरूमी रियाझ कामी आला. :) पोराने एकदा विचारलाच मला, तुम्ही का म्हणता गाणी. 

मुलांचे निरागस प्रश्न कधी कधी चकित करून चक्कीत जाळ करून जातात. मागील आठवड्यातच त्याने मला गुगली टाकला, बाबा जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण ओ? मला पटकन काय सुचलंच नाही, बुद्धिमत्ता या लौकिक अर्थाने सांगावे तर कोण आहे सध्या सर्वात बुद्धिमान व्यक्ती, त्याची/तिची बुद्धिमत्ता कोणत्या कसोट्यावर ठरवली गेली असं काहीस मनात येऊन गेलं. उत्तर द्यायचं राहलयं अजून. 

सवयीप्रमाणे काही नवीन पुस्तकं ऑनलाईन खरेदी केली. सगळं काही ऑनलाईन झालयं, गावी न जाता आल्यामुळे गणपती आरती आणि प्रसादसुद्धा ऑनलाईनचं खाल्ला यावर्षी. मित्रांशी भेटणं-बोलणं ऑनलाईन झालं, फक्त हिरव्या हिरव्या डोंगरदऱ्यात फिरताना अंगावर येणारा आल्हाददायक वारा, पाण्याचा खळखळ आवाज ऑनलाईन मिळत नाहीये. 

--मधुमय मृदगंध 
२९ ऑगस्ट २०२०