Sunday 7 June 2020

अनामिक नातं

काही व्यक्ती आपल्याला कधीही न भेटता, त्यांचा सहवास न लाभतातसुद्धा का जवळच्या वाटाव्यात हे एक अनामिक गूढ आहे. मागील आठवड्यात म्हणजे शनिवार ३० मेला रात्री ९:३० ते १०च्या दरम्यान सौंच्या हॉस्पिटलमधील सहकारी, तिची चांगली मैत्रिणीचा व्हाट्सअँप संदेश आला कि, तिचे वडील आजारी आहेत, तिने काही मेडिकल चाचण्या केल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स तिने व्हाट्सअँपवर पाठवले आहेत, त्यावर तिला सौंकडून सल्ला हवा होता

त्यांच्या चाचण्यामधून स्पष्ट दिसत होतं काही तरी मोठी गडबड आहे शरीरात पांढऱ्या पेशींची संख्या २६,००० झाली आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करणे, त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. त्यात तिच्या वडिलांना ह्दयविकार, डायबेटीस या रोगांचा त्रास आहे, त्यामुळे तर पुढील कारवाई त्वरीत होणं अत्यावश्यक होतं. तिचा भाऊ बिचारा, रात्री १:३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या ९-१० हॉस्पिटलमध्ये वडिलांना दुचाकीवरून घेऊन गेला (अंधेरी पुर्व-पश्चिम उपनगर भाग, ते राहतात घाटकोपरला), आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोनवरून विचारणा करत होतो बेड रिकामे आहेत का?? बऱ्याच मित्रांना फोन केला, काही सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांना फोन केला, कोरोना चाचणी केल्याशिवाय कुठेही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेत नाहीत असे सांगण्यात आले.

रूग्णाला ताप आहे हे बघितल्यावर सगळ्या हॉस्पिटलमध्ये हेच सांगण्यात आले, एका हॉस्पिटलने एक्स रे काढण्यासाठी ५,००० रुपये उकळले. ९-१० हॉस्पिटल फिरल्यावरही वडिलांना उपचार मिळत नाहीत म्हटल्यावर, तीचा भाऊ, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि मित्र हताश होऊन घरी परतले.

संघाच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सर्व माहिती दिली, चाचणीसाठी नंबर लावला. २४ तासानंतर म्हणजे १ जुनला त्या रूग्णांची चाचणी झाली, जी कोरोना पॉझिटिव्ह आली, हे समजलं २ जुनला आणि त्यादिवशी संध्याकाळी त्यांना अंधेरीच्या सेवन हिल्स या इस्पितळात ICU बेड मिळाला. आम्हा सगळ्यांना वाटलं चला, उपचार तरी चालू झाले. पण खरी लढाई आता होती, आतापर्यंत बेड मिळवण्यासाठी हातघाईची, लुटुपुटीची लढाई होती.

कोरोना रूग्ण, हॉस्पिटलमध्ये ऐकटेच असतात. घरातील व्यक्ती बरोबर नसतात, ना कोणी मित्र-नातेवाईक भेटायला येऊ शकतात. सगळ्याला मनाई आहे, त्यात जर रूग्ण ज्येष्ठ नागरिक असेल तर, ते ऐकटेच असल्याने, आजुबाजुला असलेली परिस्थिती बघून आणखी निराश, हतबल भावनांनी घेरले जातात. त्याच्यांशी फक्त फोनवरून बोलणं होतं. तिथली परिस्थिती फक्त फोनवरून समजते, प्रत्यक्ष डोळ्याने काही बघता येत नाही. अशा वेळी त्या रूग्णांची मानसिक स्थिती, त्यांच्या कुंटुबातील लोकांची अवस्था काय असेल याचा विचार करून अंगावर शहारेच येतील.

काल रविवार ७ जुन, दुपारी बातमी आली की ते काका आपल्याला सोडून गेले. गेल्या आठवड्यातील या अनुभवाने खुप अंतर्मुख केलं आहे मित्रांनो, का कुणास ठाऊक, त्या देसाई काकांबद्दल मनात ऐव्हढी सहानुभूतीदायक हळहळ का निर्माण झाली. ज्यांना कधी मी, माझी बायको भेटलो नाही, बघितलं नाही, ही बातमी समजल्यावर मनात अस धस्स झालं.. जवळचच कोणी तरी सोडून गेलं आहे असं वाटत राहिलं.

कदाचित, मनात भितीने शिरकाव केला आहे. सौची मैत्रीण, स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या वैकुंठ प्रवासाच्या कार्यास जाऊ शकली नाही. तिच्या भावाने, एकट्यानेच ते कार्य उरकले. कसं वाटलं असेल त्याला; एकट्याने त्या स्मशानात, वडिलांचे निर्जीव शरीर शेवटचं न्याहळताना, पार्थिवाला अग्नी देताना. विचार करवत नाही, मती गुंग होते ...

हे सगळं लिहिण्याचं कारण, कदाचित आपण आपल्या आयुष्य खुपच ग्रहीत धरतो. सगळं ठीक आहे, होईल, सरकार हळूहळू पुर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिशन बिगीन अगेन वगैरे राबवत आहे, पण काळजी घेणं खुप खुप गरजेचं आहे.

खासकरुन ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना प्रवास करू देऊ नका, सकाळी -पहाटे फिरायला जाताना शक्य तितकी प्रतिबंधकात्मक काळजी घ्या. उषःकाल होईल जेव्हा केव्हा व्हायचा तेव्हा, तो बघण्यासाठी स्वतः ची काळजी घ्या.

- मृदगंध ७ जुन