Sunday 30 January 2022

गांधी आडवा येतो

शफायत खान यांचं या नावाचे एक नाटक आलं होतं २०१२ साली. या नाटकातील लौकिक अर्थाने टपोरी गुंड असलेला "लाल्या" हा नायक आहे आणि त्याचा नाक्यावरील टपोरी गुंड ते गांधीजींच्या विचारांचा अनुयायी होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर त्याची आयुष्यात गोची होत जाते कारण; तो गांधीजींच्या  विचारप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात वागू लागतो. 

लाल्या त्याच्या प्रेयसी मायाशी लग्न करतो आणि मायाचे वडील प्राध्यापक बुध्दिभास्कर आणि आई संध्या यांना गुंड लाल्या जावई म्हणून पसंत नसतो. लाल्याचा टपोरी अवतार व त्याच्या तोंडातील शिव्या हासडणारी भाषा ऐकून दोघे पतिपत्नी हतबुद्ध होतात. अशातच प्राध्यापकांना एक फोन येतो आणि अचानक प्राध्यापक स्वतःहून लाल्याला घरी ठेवून घेण्यास तयार होतात आणि ते दोघे त्याला गांधीजींचे पुस्तकं वाचायला लावून, चमत्कार करतात. गुंड लाल्या अचानक आता गांधीवादी रिक्षावाला बनतो. अहिंसा स्वीकारतो, दारू- मांस वर्ज करतो फक्त गांधींसारखे ब्रह्मचर्य स्वीकारायला मायामुळे जमत नाही. प्रामाणिकपणे जगायला लागतो आणि मग, त्याच्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात कि, त्याला क्षणोक्षणी गांधी आडवे जायला लागतात. 

महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप येऊन प्राध्यापक बुध्दिभास्करना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. इकडे मायाचा भाऊ श्याम प्रेमभंगामुळे मनोरूग्ण होण्याच्या अवस्थेत आहे. त्याची मैत्रीण डॉली त्याला सोडून फिरोज नावाच्या एका दुसर्‍याच मुलाबरोबर गेल्यामुळे तो सूडाने पेटलेला आहे आणि त्याचवेळी मानसिक आजारी पडल्याची चिन्हे दिसत आहे. 

काही काळातच प्राध्यापकांवरील बालंट दूर होते, फिरोज एका आरोपावरून तुरूंगात जातो, श्याम सुधारतो व त्याचा आत्मविश्वास परत येतो. प्राध्यापकांचे निलंबन रद्द होऊनसुद्धा ते नोकरीचा राजीनामा देऊन आपल्याच चुनीलाल नावाच्या एका बिल्डर मित्राच्या मदतीने श्यामला बरोबर घेऊन गृहबांधणीचा  व्यवसाय सुरू करतात. पण तिथेही लोकांकडून नवीन इमारतीसाठी आगाउ पैसे घेऊनसुद्धा काम सुरू होउ शकत नाही कारण त्या जागेवरची झोपडपट्टी उठत नाही. त्यामुळे लोक पैशासाठी तगादा लावतात.

लाल्या त्याच झोपडपट्टीत रहात होता हे त्यांना समजते. पण झोपडपट्टी कशी उठवावी, पैशाचा तगादा लावणार्‍यांचा बंदोबस्त कसा करावा आणि चुनीलालकडे दिलेले लोकांचे पैसे कसे परत मिळवावे या विचाराने प्राध्यापक हतबुद्ध होतात.

त्याचवेळी प्राध्यापकांचें शेजारी व त्यांचा मत्सर करणारे नाटककार जेऊरकर एक नवीन नाटक लिहितात त्यात प्राध्यापक व त्यांच्यावर अतिप्रसंगाचे झालेला आरोप हेच कथासूत्र असते. हे नाटक रंगमंचावर आले तर आपली खूप बदनामी होईल हे प्राध्यापकांच्या लक्षात येते. इकडे फिरोज तुरूंगात गेल्यावर पुन्हा एकदा डॉली व श्यामचे सूत जमायला लागते व त्यामुळे श्यामवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियाचा संताप होतो. श्याम पुन्हा एकदा आपल्यामागे यावा यासाठी ती प्रयत्न करू लागते.

एकंदरीत प्राध्यापक, श्याम व प्रिया हे आपापल्या समस्यांनी त्रस्त होऊन गेले असतात. प्राध्यापकांना नाटककार जेऊरकर, चुनीलाल, चौकशी समिती इ.चा बंदोबस्त करायचा असतो व त्याचबरोबरीने चुनीलालने ताब्यात घेतलेले लोकांचे पैसे परत मिळवायचे असतात आणि इमारतीसाठी झोपडपट्टी ऊठवायची असते. प्रियाला डॉलीचा ससेमिरा कायमचा चुकवायचा असतो. झोपडपट्टीसाठी आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला श्यामला संपवायचे असते.

आपल्याला लाल्या मदत करेल अशी त्यांची आशा असते, पण लाल्या गांधीजींच्या विचारांनी भारावून गेलेला असल्याने व आपले सर्व काळे धंदे, टपोरीगिरी त्याने बंद केलेली असते. अचानक सर्वांच्या मनासारखे होते. फिरोज तुरुंगातून सुटतो व डॉलीबरोबर लग्न करून तो शहर सोडून जायचे ठरवितो. श्याम प्रियाकडे प्रेमयाचना करून तिचे प्रेम स्वीकार करतो. चुनीलालने ताब्यात घेतलेले ४० लाख रूपये प्राध्यापकांना परत मिळतात. सामाजिक कार्यकर्ती रेल्वेरूळावर मेलेला आढळतो. नाटककार जेऊरकरांच्या चेहर्‍याला काळे फासले जाते व शेवटी पोलिसांनी *लाल्याचे एनकाऊंटर केल्याची बातमी येते.*

नक्की काय होते? लाल्या सुधारलेला असताना लाल्याचा एनकाऊंटर का होतो? चुनीलाल घेतलेले पैसे कसे परत देतो? फिरोज का तुरूंगात जातो व नंतर तो कसा सुटतो? तो शहर सोडून जायचे का ठरवितो? जेऊरकरांच्या चेहर्‍याला कोण काळे फासतो? सामाजिक कार्यकर्ता शेट्टी कसा मरण पावतो? या सर्वांची उत्तरे, गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसा, साधी राहणी, दारू -मांस सेवन आणि शारीरिक इच्छाचा (ब्रम्हचर्य) यांचा त्याग या तत्वज्ञानात आहेत. कारण, लोकांना, राजकीय मंडळींना फक्त आभासी, आदर्शवत विचार फक्त आणि फक्त दुसऱ्यांना सांगण्यापुरते हवे आहेत, त्याप्रमाणे धोरणं राबवून देशाचे, समाजाचे आणि त्यायोगे जनतेचे भले करण्यासाठी खरेच पाहिजे आहेत का ? असा प्रश्न पडतो, कारण सध्या आजूबाजूला जे घडते आहे, ज्या पद्धतीची धोरणं महाराष्ट्रात आखली जात आहेत, ते बघून हेच म्हणावे वाटते *गांधी आडवा येतो* आणि आम्ही लोक, त्यांच्या विचारांविरुद्ध वागून गांधीजींचा रोजच खून करतो.  

सध्या लोक आणि बरेच तथाकथित गांधीवादी राजकीय नेते, नुस्ताच जिभेचे पल्हाळ लावतात की गांधीजींच्या विचारांची देशाला, तरुण वर्गाला, भावी पिढीला अंत्यत गरज आहे आणि गोडसेंच्या नावाने खडे फोडून, म्हणतात गोडसेने गांधींना मारलं पण त्यांचे विचारांना, त्यांच्या तत्वज्ञानाला मारू शकला नाही. पण आपण कधी त्यांच्या विचारानुसार वागतोय का? वागलो तर सध्याच्या निर्दयी दुनियेत जगू शकू का? गांधींजींच्या विचारानुसारच दारू आणि नशा करण्याची साधने यावर बंदी असावी असे मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद ४७) साविंधानामध्ये आहे आणि सध्या, वाईन -बियर किराणा दुकांनामधून विकली जावी म्हणून शासन धोरण बनवत आहे. या निर्णयाला विरोध करणारे म्हने शेतकरी विरोधी होतात. ड्राय डे आहे म्हणून गळे काढणारे तर गल्लोगल्ली दिसतात आणि नशेची साधने, हर्बल तंबाखू म्हणून विकली जातात आणि ड्रग्ज विक्रीच्या आंतराष्ट्रीय टोळीचा भाग असणाऱ्या सुपरस्टारच्या पोरग्याला जामीन मिळावा म्हणून माध्यमे, काही टुच्चे नेते आगडपाखड करतात, त्याला पकडणाऱ्या अधिकाऱ्याचाच लाल्या करून टाकतात. 

शेवटी काय तर, गांधी आडवा येतो .. 

(अनुच्छेद ४७ - https://www.constitutionofindia.net/constitution_of_india/directive_principles_of_state_policy/articles/Article%2047) 

गांधीजींची पुस्तकें 

१) https://www.mkgandhi.org/ebks/India-Dreams.pdf

२) https://www.mkgandhi.org/ebks/hind_swaraj.pdf

No comments:

Post a Comment