Thursday 13 June 2019

मनसोक्त

माळरानावर उनाड बागडून,
गवताच्या पात्याचें बाण मारून,
झाडांना हाताने -पायाने स्पर्श करून,
खूप दिवस झाले

गावातील जुन्या विहिरीत सूर मारून,
शाळेच्या मैदानातील गुलमोहर पाहून,
चटका मारणाऱ्या उन्हात फिरून,
खूप खूप दिवस झाले

गल्लीतील पोरांबरोबर हाफ पीच खेळून,
गटारीत गेलेला बॉल दोन बोटात उचलून,
भर दुपारी पळत येत; थंड पाणी पिऊन,
खूप खूप खूप .. दिवस झाले

उन्हाळाच्या सुट्टीत आवळे, चिंचा
कैऱ्या, जांभळं पाडून,
कावडीला नाही तर सायकलला घागरी बांधून,
खूप, खूप, खूप ..म्हणजे खूपच दिवस झाले

स्लो सायकलची रेस लावून,
चिखलात हात बरबटून अन किल्ला बांधून,
कोण पाणी उंच उडवत; विहिरीत गट्टा ऊडी मारून,
खूप, खूप, खूप ... खुप्पच दिवस झाले

थोडक्यात काय, मनसोक्त जगून...
खुप दिवस झाले

- मधुमय मृदगंध, १४/०६/२०१९

1 comment: